अजित पवार यांचे आवाहन
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूचीमुळे (एनपीआर) कोणीही घाबरून जायचे, काळजी करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील नागरिकांना त्याचा कसलाही त्रास होणार नाही, असे सांगत महाविकास आघाडी सरकारमध्ये त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस योग्य ती काळजी घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. बिहारमध्ये सीएएच्या विरोधात ठराव केला वगैरे सांगून कोणी चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला तर सांगा महाराष्ट्रात कोणालाही त्रास होणार नाही असा शब्द आपले नेते शरद पवार यांनी दिला आहे याची त्यांना खात्री द्या, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
बुलेट ट्रेनच्या खर्चाचा नाहक बोजा महाराष्ट्रावर टाकल्याबद्दलही अजित पवार यांनी भाजपवर टीका केली. विधानसभेत नवाब मलिक निवडून आले आहेत. दोन वर्षांत मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. पुढच्या काळात समविचारी पक्षांना घेऊन एकत्र जायचे आहे. शिवसेनेची विचारसरणी वेगळी असली तरी भाजपपेक्षा किती तरी चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. येत्या काळात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. जास्तीत जास्त १० आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत, असे आवाहन अजित पवार यांनी केले. महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देणार असून राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांनीही मुंबईसाठी महिन्यातून एक दिवस दिला तर चांगले नियोजन आणि पक्षाचे संघटन वाढेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
समाजाचे भले करण्यासाठी पदाचा उपयोग करा. पवार साहेबांना व मला मान खाली घालावी लागेल असे वागू नका असे सांगताना आता हौसे नवशे गवशे येतील मात्र त्यांना पदांपासून दूर ठेवा. दोन वर्षे त्यांना काम करू द्या. पदे मिळाली ते पक्ष सोडून गेले. त्यामुळे सत्ता नसतानाही जे राहिले त्यांना पदे द्या, असा आदेशही अजित पवार यांनी दिला.
मुंबई महापालिकेत २०२२ मध्ये भाजपची सत्ता- शेलार
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ५०-६० जिंकण्याचे ध्येय ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपचे नेते आशीष शेलार यांनी खिल्ली उडवली आहे. मुंबई महानगरपालिकेत आता भाजपची सत्ता येणार, असा दावाही शेलार यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणाले, २०२२ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला ६० मिळतील. तर दुसरे म्हणाले ५० जिंकू. पण आठ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडेच होता येते. ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर. विनोदीच आहे सगळे. पालिकेत अबकी बार भाजप सरकार, असे ट्वीट आशीष शेलार यांनी केले आहे.
‘महापालिकेत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर यावा’
राष्ट्रवादीचे मिशन मुंबई हे शिवसेना व इतर पक्षांच्या विरोधात आहे, अशा वावडय़ा उठवल्या जात आहेत. परंतु आमचे हे मिशन पक्षाचा विस्तार व्हावा, जनमताचा पाठिंबा मिळावा यासाठी आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम झाले. त्याऐवजी मुंबईचे महत्त्व पूर्ववत करण्याचे काम यातून होणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे ती राहिली पाहिजेच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर गेली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.