गिरणी कामगारांना घर मिळाल्याचा आनंद

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) गिरणी कामगारांच्या सदनिकांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे येथील कार्यालयात रविवारी सोडत काढण्यात आली. यावेळी सदनिकांच्या सोडतीत आलेले नाव पाहण्यासाठी गिरणी कामगारांनी म्हाडाच्या कार्यालयात गर्दी केली होती. सोडतीत नाव आलेल्या कामगारांच्या चेहऱ्यावर हक्काचे घर मिळाल्याचा आनंद झळकत होता. 


संतोष सुर्वे यांचे म्हाडाने काढलेल्या सोडतीच्या यादीत नाव आले असून हक्काचे घर मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ‘२००४ मध्ये गिरणी बंद झाल्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. नुकतीच मुलगी झाली होती. त्यामुळे कुटुंबाची मोठी जबाबदारी होती. मिळेल ते काम करत संसाराचा गाडा हाकला. काही वर्षांनी रिक्षा चालविण्याचा परवाना मिळवून त्यावर गुजराण सुरू ठेवली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर स्वत:च्या हक्काचे घर मिळाले. मात्र माझ्याबरोबर काम करत असलेल्या सहकाऱ्यांची नावे यादीत नसल्याने हा आनंद क्षणभरासाठीच आहे. गिरणी बंद झाल्यावर सगळ्यांनाच खडतर संघर्ष करावा लागला. त्यामुळे त्यांनाही सरकारने लवकर घरे देऊन न्याय देवा,’ अशी मागणी सुर्वे यांनी केली.


तर अनिता मालवणकर या गिरणी कामगाराच्या पत्नी आहेत. त्यांनाही या सोडतीत सदनिका मिळाली. मागील ३८ वर्षांपासून घरांसाठी संघर्ष सुरू असल्याचे त्या सांगतात. ‘श्रीनिवास मिलमध्ये १९८२ मध्ये संप झाल्यावर गिरणी बंद झाली. त्यामुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याने दोन वर्षे गावाला राहावे लागले. त्यानंतर दुसरीकडे पतीला काम मिळाल्यावर मुंबईत परतलो. आज पती जिवंत असते तर हक्काचे घर मिळाल्याचा आनंद त्यांना झाला असता,’ अशा भावना व्यक्त करताना त्या भावुक झाल्या होत्या.


तर गिरणी कामगाराचा मुलगा असलेल्या विजय बर्गे यांनाही यात घर मिळाले. बॉम्बे डाइंग मिलमध्ये विजय बर्गे यांचे वडील कामाला होते. मागील १४ वर्षांपासून त्यांनी घरांसाठी संघर्ष केला. त्यांना नायगाव येथे घर मिळाले आहे. घर मिळण्यासाठी थोडा उशीर झाला असल्याचे विजय सांगतात.